Description
- Book name: सरवा
- Language: मराठी
- Author: प्रा.महादेव श्रीराम लुले
- Publication : परिसस्पर्श पब्लिकेशन
- Category: कविता संग्रह
- ISBN: 978-81-955782-3-8
काव्य लिखाण करणे ही एक उपजत कला आहे. ज्या व्यक्तीकडे ती कला आहे ती व्यक्ती आपले विचार, आपल्या भोवतालची परिस्थिती व आपले मन कवितेत उतरवत असते.
सुगी सरुनिया गेली, पिक सोंगलं परवा
चला चला ग बायांनो, चला येचू ग सरवा (कविता: सरवा)
किंवा
महाग झाले होते, भाकरीच्या घासाले
म्हनून लटकले दोघबी, भाकरीसाठी फासाले. (कविता: भाकरीचा फास)
प्रा.महादेव लुले यांचा ‘सरवा’ कवितासंग्रह शीर्षकापासून ते शेवटापर्यंत वाचताना लक्षात येते की शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांचे आनंद, एकंदरीत त्यांचे जगणे हे कवी महादेव लुले यांच्या कवितेचे प्राणतत्त्व आहे. ते त्यांच्याच बोलीभाषेत मांडल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे अधिक सुलभ झाले आहे. शिवाय वैदर्भीय बोली भाषेतही समृद्ध भर पडली आहे. एकंदरीत गीत, अंगाई, पाळणा, ओव्या, अभंग, मुक्त्तछंद, पोवाडा, बालकविता, लघुकविता, अष्टाक्षरी इत्यादी अनेक काव्यप्रकार या संग्रहात आहेत त्यामुळे कविता एकसुरी वाटत नाहीत.संत साहित्यामध्ये मुख्यत्वे हाताळलेला मराठी साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे ओव्या!
आठवी माई ओई गं । आई तुया कष्टाले ॥
अळानी असून शिकोते । घळी घळी ते बाळाले (ओव्या)
आईचे संपूर्ण स्वरूप, स्वभाव, प्रेम विषयक भावना त्यांनी ओव्या या प्रकारात रचल्या आहेत. आईला आदिशक्त्तीचे रूप मानलं आहे. स्वत:च्या लुगड्याची झोळी करून प्रेम देणारी आई, स्वत:चे आई दूध आटल्यावरही पीठ कालवून लेकराला भरवणारी आई, सर्व भावंडांना एकसमान प्रेम देणारी आई, कष्ट करणारी आई, स्वत: अडाणी असूनही आपल्या लेकराला ज्ञान देऊन घडवणारी आई या ओव्यांमधून साकारलेली दिसते. आई विषयीच्या अनेक कविता या संग्रहात आहेत.
मायच्या काखीत, लेक लानच रायते
माय गेल्यावर चव, दुधाची कयते.(कविता: मायची किंमत)
कविता हा अल्पाक्षरी प्रकार आहे. लुले यांच्या अनेक कविता अल्पाक्षरी आहेत.
कविते चांन्याच्या दुनियेत वावरू तरी कसा?
ग्रह नक्षत्र त् सबनच पलटले.(कविता: ग्रह)
किंवा
पांढरा चंद्र काया डाग, माऊलीच्या इभ्रतिचा तो राग
तरी बी मी आम्ही पुजतो कर्वाचोथले तोच चंद्र..(कविता: डाग)
किंवा
रक्त्त आटते, घामाले बी भेटते, कवडीमोल (हायकू: बाप आमचा)
‘वांझोटा पाऊस’, ‘समतेच्या झाडाच्या पाल्यापासून बनवलेली लस’, ‘शाकाहारी जीभ’ अशा काही नवीन प्रतिमांची भर या कवितांमध्ये घातलेली दिसते. ‘बिब्बा घालणे’, ‘तीन तेरा वाजणे’ ‘काळ गेला वेळ गेली’ इत्यादी अनेक म्हणीं वाक्यप्रचारांचा उपयोग या संग्रहातील कवितांमध्ये केलेला आहे. अलीकडच्या काळात ‘व्हायरस’ हा अतिशय प्रसिद्ध झालेला शब्द; परंतु या नावाची संग्रहातील कविता मात्र खूप वेगळी आणि मराठी साहित्यातील एक महत्त्वाची कविता म्हणून गणली जावी इतकी खोल आहे. शाळेतल्या जिवाभावाच्या मित्रांमध्ये वाढत्या वयानुसार वेगवेगळ्या जाती धर्मांत निर्माण झालेली कटुता आणि वाढलेली दरी ‘व्हायरस’ या कवितेत उत्कृष्टरित्या दाखवून दिलेली आहे.‘सातबारा’ या कवितेत शाळेत येऊन शिकणाऱ्या मुलाचे प्रातिनिधिक गार्हाणे शिक्षकाकडे मांडलेले आहे.
मोबाईलातच भरते वर्ग, शाळा शिकनं घरुनं
तुमचा आमचा समंध, फक्त दुरून दुरून..(कविता: फक्त लळ म्हना)
ऑनलाइन शिक्षणाचे बरे वाईट परिणाम दाखवताना ‘फक्त लढ म्हना’ या कुसुमाग्रजांच्या अत्यंत गाजलेल्या कवितेचा आधार घेत ‘फक्त लळ म्हना’ ही कविता लिहिलेली आहे. फार जोडाक्षर नसलेल्या, बालकांना आवडतील आणि सहज गाता येतील अश्या लयबद्ध बालकविता या संग्रहात आहेत.उदा.
जिकळे तिकळे, पानीच पानी
आनंद झाला, माह्या मनी
शाळेले सुट्टी, दिवसभर…
(बालकविता: पावसाची सर)
समाजभान, निसर्गभान, मानवतावाद याचे भान राखत आशय आणि अभिव्यक्त्ती यांनी परिपूर्ण असलेल्या अंगाई, अनाथ, देव, पोरी, नार, दिवाळी, नदी, दारू, गरीबी, माणुसकी, साहित्य-संस्कृती, बालपण, अवकाळी पाऊस, पाण्याचा अभाव, कोरोना, संमेलन, राजकारण अशा अनेक विषयांवरील कविता या संग्रहात आहेत.’दोन बायका फजिती आयका’ यासारख्या हसून हसून पोट दुखेल अशा विनोदी कवितांपासून ‘धोंडी’ यासारख्या डोळे पाणावतील इतक्या दर्दभऱ्या कविता या संग्रहात आहेत. आपल्या या मातृभाषेचा, आपल्या भूमीचा अभिमान शब्दाशब्दातून जागवणाऱ्या कविता या संग्रहात आहेत.
असा हा विदर्भ आमचा देस, रंगारंगी त्याचा हाये वेस
देवबाबू पोवाळ्यात गातो गुन येस, जी जी जी! (वऱ्हाडाचा पोवाळा)
किंवा
अवघ्या भाषेत गुयचट, तिले सागराची खोली
आमची वऱ्हाडी बोली, म्हंजे गुयाची भेली. (कविता: आमची वऱ्हाडी बोली
गुयाची भेली )
एकंदरीत काय तर वऱ्हाडी बोलीतील कविता जरी असल्या तरीही त्या प्रत्येक मराठी भाषिक वाचकाला त्या पूर्णपणे समजतातच! याचे मुख्य कारण त्यांच्या कवितांमध्ये ‘आकलन सुलभता’ हा महत्त्वाचा गुण आहे.
कवितासंग्रहाचे शीर्षक जरी ‘सरवा’ असले तरी उत्कृष्ट बौद्धिक खाद्य पुरवणार्या, चिंतन करायला लावणाऱ्या आणि उत्तम जीवनदृष्टी देणार्या कविता या संग्रहात आहेत आणि म्हणूनच कविताप्रेमी रसिक नक्कीच याचे भरभरून स्वागत करतील, अशी आशा व्यक्त्त करते!
-प्रा. प्रतिभा सराफ, मुंबई
Reviews
There are no reviews yet.