Sahityakshar Prakashan

प्रा यशवंत माळी यांच्या परतीच्या पाऊस या कथा संग्रहाबददल दैनिक लोकमत मध्ये …

कृषिजीवनाचे अस्सल चित्रण -परतीचा पाऊस

परतीचा पाऊस ' हा कृषिजाणिवांचा कथासंग्रह साहित्याक्षर प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे. प्रा . यशवंत माळी यांच्या सकस लेखणीतून हा कथासंग्रह साकारला आहे. . एकूण तेरा कथा असलेला या कथासंग्रहात कथा या वाङ्मयप्रकाराची आगळी वैशिष्टये आपणांस दिसून येतात . कथासंग्रहाचे मुखपृष्ठ सरदार जाधवांच्या अप्रतिम चित्र शैलीतून साकारले आहे .

या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ हे कथा संग्रहाची शीर्षक कथा ' परतीचा पाऊस ' या कथेचा आशय स्पष्ट करणारे आहे. दुष्काळाची पार्श्वभूमी स्पष्ट करणार्‍या पिवळया रंगाच्या, करपलेल्या गवतामध्ये बसून परतीच्या पावसाची वाट पाहणारा शेतकरी बसलेला दिसतो. गाव सोडून जाणार्‍या गावकर्‍यांचा प्रतिकात्मक दूर उडून जाणाऱ्या चित्रात दिसणाऱ्या पक्ष्यांच्या रुपात दिसते. मलपृष्ठावर प्रा . डॉ. रा .रं . बोराडे पाठराखण आहे . अतिशय देखणी व उच्च निर्मितीमूल्ये साहित्यकृती साहित्याक्षरने वाचकांस उपलब्ध करून दिली आहे.

'मोसमी असो नाहीतर परतीचा
निसर्गाची कृपा म्हणजेच पाऊस ....
सर्व अडचणींवर मात करून
मातीमध्ये घाम गाळून
सोनं पिकवणाऱ्या
जगाच्या पोशिंद्यास .. . .! '

अशी अर्पणपत्रिका या कथा संग्रहाची आहे . . .. या धरतीवर कष्ट करून अन्न निर्मिती करणाऱ्या कृषीसर्जकास लेखकांनी हा कथासंग्रह अर्पण केलेला आहे. या कथासंग्रहास डॉ. संजय बोरुडे यांचे दोन शब्द लाभले आहेत . या दोन शब्दांमध्ये समकालीन ग्रामीण कथाकारांमध्ये प्रा . यशवंत माळी यांचे स्थान निश्चित केले आहे . यात १९९० नंतरच्या कथाकारांमध्ये प्रा . यशवंत माळी यांचे कथालेखन हे त्याच्या कथा लेखनाच्या गुणवैशिष्ट्यांनी कसे अग्र व अढळ स्थान प्राप्त केल्याची नोंद ते घेतात . 'बदलत्या सांस्कृतिक आणि सामाजिक पार्श्वभुमीवर खेडुतांच्या जगण्याचे वस्तुनिष्ठ आकलन यशवंत माळी यांच्या कथांतून जाणवते ' असे मत डॉ. संजय बोरुडेनी आपल्या दोन शब्दां मध्ये व्यक्त केले आहे .
तेरा कथांचा हा कथासंग्रह पूर्णपणे कृषिजाणिवांचा आहे . या सर्वच कथा ग्रामीण भागातील जगण्याचे ताणेबाणे , वृत्ती प्रवृत्ती, व्यक्तींचे व त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे अस्सल प्रतिबिंब रेखाटतात. दैनंदिन जगण्यात येणाऱ्या समस्या ,होणारी उरस्फोड , कोंडी, मानसिक विघटनाचे अनेक व्यक्तिमत्वे या कथांमधून येतात. . शीर्षक कथेमध्ये पावसाची वाट पाहून निराश झालेला विकासनाना जेव्हा , " कसं तडफडत जगायचं? कुठंवर टाचा खोडायच्या? त्यापेक्षा झट्दिशी मरायजोगतं इक आणून दया कुठंनतरी . मीबी खाते अन् पोरांनाबी घालते . सुटंल तरी द्या वैतागातनं " बायकोचं हे बोलणं विकासनानाच्या अख्खा मोसम कोरडा जावून परतीचा पाऊसही न येण्यापेक्षा जास्त जिव्हारी लागतं आणि त्याच्या जगण्याच्या दिशा अस्पष्ट होतात .

या कथा संग्रहातील स्त्री पात्रे ही ग्रामीण समाजातील स्त्रियांचे वास्तव चित्रण करणारी . आहेत . 'पुरस्कार, ' 'खोटा मणी ' , 'वाटीभर दही ' या कथांमधून येणारी स्त्रीपात्रे ही वेगवेगळ्या भूमिकांमधून येतात . 'पुरस्कार'या कथेतील शिक्षिका लाडबाई ही निर्ढावलेली ,संकुचित वृत्तीची , कामचोर स्वार्थी मनोवृत्तीचे प्रतिनिधीत्व करणारी आहे. 'खोटामणी ' या कथेतील पत्नीच्या रुपात येणारी रुपा ही पारंपरिक , छळ होणारी , आयुष्यभर दुःखाचे चटके भोगत असणारी तरीही हुंदका ओठाबाहेर पडू न देणारी समाजाला अपेक्षित स्त्री अधोरेखित होते . 'पोटगी 'या कथेतील 'मायक्का ' ही नवऱ्याच्या चवचालपणाचा खंबीरपणे सामना करत, त्याला नामोहरम करणारी स्त्री येते . मायक्का ही प्रस्थापित समाजाच्या , बायकोला पायाची वहाण समजणाऱ्या सामाजिक प्रवृत्तीला झुगारून धडा शिकवणारे पात्र आहे तर 'वाटीभर दही ' या कथेत सोशिक आणि नाटकी अशा दोन स्वतंत्र मनोवृत्तीचं प्रतिनिधित्व करत करणारी आहेत . याच कथेत घराघरांतून आई आणि बायको यांच्या मध्ये मुलांचे होणारे मरण चित्रित होते . .

'बधीर जखमा ' आणि 'खरेदी 'या कथेमध्ये बिघडलेल्या संस्कारहीन पिढीचे प्रतिनिधीत्व करणारी . मायबापाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर देवून स्वार्थ साधणाऱ्या स्वतः च्या सुखामध्ये मग्न होणार्‍या पिढीचे दर्शन करणारे पोटची मुले आहेत. । 'बधीर जखमा 'मधील सुभाष हा डिजीटल जगातील संकुचित मनोवृत्तीचं आळशी कामचोर उलट्या काळजाचा म्हणत येईल इतपत कृतघ्न मायबापाला निराधार करणारा मुलगा वाचकास अस्वस्थ करून सोडतो .
. 'कशासाठी पैशासाठी ' या कथेत ग्रामीण भागातील रुग्णांची होणारी लूट , डॉक्टरांचा पैशाचा हव्यास आणि पेशंटची होणारी फरफट हे विदीर्ण वास्तव रेखाटते . 'ऋणानुबंध ' या कथेत आत्मिक पातळीवर होणारा संवाद वाचकास सुखावून जातो.

संपूर्ण कथासंग्रह हा ग्रामीण वास्तव रेखाटणारा आहे.कृषकाच्या जगण्याची दिशा आणि दशेचे वास्तव चित्रण करणारा हा कथासंग्रह मराठी साहित्यात निश्चितच मोलाची भर घालणारा आहे.

✍🏻 ©रचना
कथासंग्रह - परतीचा पाऊस
लेखक - यशवंत माळी
प्रकाशन - साहित्याक्षर प्रकाशन
मूल्य - २१० रु See less