कवी,लेखक व समीक्षक डाॕ.संजय बोरुडे यांनी अनुसृजन केलेला *अभिसत्य* हा कवितासंग्रह डिसेंबर २०२२ मध्ये साहित्याक्षर प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.हा कवितासंग्रह हंगेरियन कवी *सॕन्दोर हालमोसी* यांनी लिहिला आहे.ते हंगेरीतील मान्यताप्राप्त कवी आहेत.त्यांच्या कवितांचा अत्यंत तरल भाषाशैलीत कवी संजय बोरुडे यांनी अनुवाद केला आहे.पण त्यांनी त्यास अनुसृजन असे म्हटले आहे.कारण अनुवाद ही एक नवनिर्मितीच असते,असे ते मानतात.मूळ रचनाकाराला जे व जसं म्हणायचं आहे ते व तसं ते अनुवादात उतरवण्याची काळजी घेतात.त्यामुळे ते म्हणतात ,'मूळ कवीच्या उरातली आग,धग,ओलावा,आस्था ,भावना जशाच्या तशा वाचकांपर्यंत पोहोचवण्याची उर्मी माझ्यातल्या अनुवादकाला जिवंत ठेवते.
मराठी साहित्यात उमा कुलकर्णी ,वीणा गवाणकर,सुप्रिया वकील,वसंत केशव पाटील,सोनाली नवांगुळ अशा अनेक थोर लेखकांनी विविध भाषेतील लेखकांच्या पुस्तकांचा अनुवाद केला आहे.त्यामुळे सामाजिक ,शैक्षणिक ,सांस्कृतिक तसेच राजकीय पर्यावरण भिन्न असलेल्या प्रांतातील अथवा देशातील साहित्य परंपरा व लेखन वाचून मराठी माणूस दिवसेंदिवस समृद्ध होतो आहे.हे वाचताना एक बाब लक्षात येते,राज्य ,देश,खंड वेगळे असले तरी मानवी वृत्ती तीच आहे.मग त्या भोवतालाकडे कवी,लेखक कोणत्या संवेदनशीलतेने पाहतो आणि आपल्या लेखनात त्याचा अन्वयार्थ कसा लावतो,हे साहित्यिकाने अभ्यासणे व रसिकाने वाचणे तितकेच अपरिहार्य ठरते.
सॕन्दोर हालमोसी यांनी लिहिलेला व संजय बोरुडे यांनी अनुसृजित केलेला *अभिसत्य* हा कवितासंग्रह सर्वार्थाने वाचनीय आहे.या काव्यग्रंथाचे एकूण तीन खंड आहेत.त्यातील हा पहिला खंड आहे.वाचक काव्यबीजानुसार संपूर्ण संग्रह १.किती शक्तिशाली २.सूर्याच्या ठिक-या ३.अभिसत्य ४.ओम्स्क शहरावरचे आकाश अशा चार भागात वाचत जातो.
*एक रेणू* या कवितेत कवी म्हणतात ,
*शब्दांना नुसती शक्ती नसते
त्यांना पण एक इतिहास आणि
कुटुंबवृक्षही असतो*
शब्दांचे अलोट सामर्थ्य सांगणाऱ्या या ओळी.
किंवा
*दोन शब्दांमध्येच
नांगर चालतो...
चरित्र्यवान
आणि
चरित्रहीन*...!
अशा अनेक अल्पाक्षरी कविता मनाचा ठाव घेतात.विचार करायला लावतात.तसेच कवितेत आलेले 'गवती चहा','पुरोहित','झगा' अशा अनेक देशी शब्दांनी कविता वाचकाला आणखी जवळची वाटायला लागते.कवी सॕन्दोर हालमोसी यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये 'शुद्ध साहित्यासाठी आक्रोश' नावाचा जाहिरनामा प्रकाशित केला आहे.जगावर येऊ घातलेल्या संकटावर अध्यात्मिक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.अशा जागतिक चळवळीचे समन्वयक असणाऱ्या एक अस्सल कवीची वैश्विक कविता म्हणजे *अभिसत्य*
साहित्याक्षर प्रकाशनने या संग्रहाची उत्तम निर्मिती केली आहे.आशयपूर्ण मुखपृष्ठ सॕन्दोर व सरदार यांचे आहे.आतील छायाचित्रे सॕदोर हालमोसी ,हंगेरी यांची आहेत.मूळ कवीला आपल्या काळजापर्यंत पोहचवण्यात संजय बोरुडे यशस्वी झाले आहेत.या संग्रहाचे स्वागत ! कवी संजय बोरुडे यांचे मनापासून अभिनंदन !
अनुसृजन
कवितासंग्रहःअभिसत्य
मूळ कवीःसॕन्दोर हालमोसी,हंगेरी
अनुसृजनःडाॕ.संजय बोरुडे
प्रकाशनःसाहित्याक्षर प्रकाशन
स्वागतमूल्यः१२०/